ठाणे - तुझी माझ्या मुलीसोबत लग्न करायची लायकी नाही, असे मुलीच्या प्रियकराशी वाद झाल्याने संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या आईची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. ही घटना कल्याण तालुका हद्दीतील गुरवली गावानजीक असलेल्या काळू नदीलगतच्या जंगल परिसरात घडली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी प्रियकराला गजाआड केले आहे. समीर बबन दळवी (वय 24 वर्षे, रा. गुरवली), असे हत्येप्रकरणी गजाआड केलेल्या प्रियकराचे नाव आहे. तर सोनी देवराज शेरवे (वय 39 वर्षे, रा.बनेली), असे हत्या झालेल्या प्रेयसीच्या आईचे नाव आहे.
वाढदिवसाला बोलविल्याने घडला प्रकार
10 जुलैला कल्याण तालुक्यातील गुरवली गावचे हद्दीतील काळू नदीचे लगत असलेल्या जंगलातील झाडा-झुडपात सोनीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्यानंतर 11 जुलैला कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करून पोलिसांनी मृत महीलेच्या नातेवाईकांकडे तपास करीत असतानाच मृत महिलेच्या मुलीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रियकर समीरला बोलावले होते. त्यावेळी मृतक सोनी व समीरमध्ये वाद होऊन 'तुझी माझ्या मुलीसोबत लग्न करायची लायकी नाही', असे बोलल्याने त्यांच्यात वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांना चौकशीत समोर आल्याने पोलिसांनी समीरला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली.
शेवटचे मोबाईलवर बोलणे झाले होते मुलीशी
मृत सोनीही केडीएमसीमध्ये कंत्राटी कामगार होती. ती 4 जुलैला नेहमीप्रमाणे कामावर गेली असता, त्याच दिवशी तिने तिच्या सावत्र मुलीला फोन करुन आपण गुरवली येथे काही फळे घेण्यासाठी जात आहोत. त्यामुळे तोपर्यंत घरावर लक्ष ठेव, असे सांगितले. तिचा संध्याकाळी चार वाजेपर्यंत मोबाईल सुरू होता. मात्र, त्यानंतर तिचा मोबाईल बंद झाला. ही बाब मृताच्या मुलीने त्यांच्या नातेवाईकांना सांगितली. यामुळे नातेवाईकांनी तिचा गुरवली जंगलात शोध घेतला. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. अखेर नातेवाईकांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात सोनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली.
मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत
कल्याण तालुका पोलीस बेपत्ता सोनीचा शोध घेत होते. याच दरम्यान तिचा मृतदेह गुरवलीच्या हद्दीत सापडला. खळबळजनक बाब म्हणजे सोनीच्या मृतदेहाची प्रचंड दुरावस्था झाली होती. पोलिसांच्या हाती जेव्हा तो मृतदेह लागला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता. या प्रकरणी कल्याण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू वंजारी यांनी तपासासाठी काही पथके नेमली होती. मृत सोनीच्या संपर्कात असलेल्या सर्व नातेवाईकांची पोलिसांनी विचारपूस केली. या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, सोनीची सावत्र मुलगी आणि समीर यांच्यात प्रेमसंबंध आहेत. याच मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वीच मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी सोनीचे समीर सोबत भांडण झाले होते.
17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
मृत सोनी ही गुरवली येथे गेल्याचे तिच्या मुलीनेच प्रियकर समीरला सांगितले होते. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी तपासाची सूत्रे फिरवून समीर याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता समीरने हत्येच्या गुन्ह्याची कबूल दिली. पोलिसांनी बुधवारी (दि. 14 जुलै)आरोपी समीरला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अधिक तपास पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विजय सुर्वे हे करत आहेत.
हेही वाचा - अटगावजवळ रेल्वे ट्रॅकवर घुसला गॅस टँकर; मोठी दुर्घटना टळली