ठाणे - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. यामध्ये आपल्या २० जवानांना वीरमरण आले. चीनच्या या हल्ल्याचा गुरुवारी डोंबिवलीत भाजप युवामोर्चातर्फे निषेध करण्यात आला. यावेळी भाजयुमोने चीनचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळून आपला निषेध नोंदवला.
भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनी सैन्याच्या हल्ल्यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. चीनच्या या कृत्याच्या निषेध नोंदवत देशभरात चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जात आहे. तर, अनेक ठिकाणी चीनी मालाची होळी करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व मंडलच्या भाजयुमोने चीनचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. या आव्हानात्मक प्रसंगी सर्व भारतीय तरुण, भारत सरकार आणि भारतीय जवानांसोबत आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत. चीन असो वा पाकिस्तान, घुसखोरी आणि दहशतवाद याबद्दल आपले झिरो टॉलरन्स हेच धोरण असले पाहिजे, अशी भावना यावेळी भाजयुमोने व्यक्त केली. तर चीनच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत चीनी साहित्यावर बहिष्कार टाकण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले. यावेळी भाजयुमोचे अथर्व ताडफळे, मंदार जोशी, रोहन देसाई, राजा सिंघानी, श्रेयस मानकामे, चिन्मय कामतेकर, भूषण देव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.