ठाणे - सत्ताधारी शिवसेना व महापालिका प्रशासनाच्या दृष्टिने अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्या नगरसेवकांचा आवाज ठाणे महापालिकेच्या वेबिनार महासभेत 'म्यूट' केला जात होता, असा खळबळजनक आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश देणाऱ्या पदाधिकारी वा अधिकाऱ्याचे नाव जनतेसमोर जाहीर करावे. तसेच महासभांच्या कामकाजाचा व्हिडीओ वेबसाईटवर जारी करावा, अशी मागणीही पवार यांनी केली आहे. तर याबाबत पुढे होणाऱ्या वेबिनार महासभेत यायचे की नाही, याबाबत बैठक घेणार असल्याचेही भाजपा नगरसेवक नारायण पवार यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेची दुसरी वेबिनार महासभा १८ सप्टेंबर रोजी पार पडली. यापूर्वी ८ सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या वेबिनार सभेप्रमाणेच या सभेचेही कामकाज अनाकलनीय होते. या सभेत काही विशिष्ट नगरसेवकांचा आवाज पद्धतशीरपणे म्यूट करण्यात आला. एखादा मुद्दा अडचणीचा असल्याचे वाटल्यानंतर, संबंधित विषयावर बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकाचा आवाज बंद केला जात होता. महापौर म्हणून आपण सभेच्या अध्यक्षस्थानी होतात, या प्रकरणाची आपण चौकशी करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.
कोरोना केंद्र व क्वारंटाइन सेंटरसाठी करण्यात आलेल्या अनिर्बंध खरेदीविरोधात महासभेत प्रशासनाला विचारणा करण्यात येणार होती. मात्र, याबाबत मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पद्धतशीरपणे आवाज 'म्यूट' करण्यात आला. अनिर्बंध व अवाजवी दराने केलेल्या खरेदीला आपला आशीर्वाद असल्याचे आम्ही समजायचे का? असा सवालही नगरसेवक पवार यांनी विचारला आहे. तसेच याबाबत पुढे होणाऱ्या वेबिनार महासभेत यायचे की नाही, याबाबत बैठक घेणार असल्याचे पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा - भाईंदर पश्चिममधील झोपडपट्टीवासियांचा कोरोना चाचणीला विरोध; पालिकेवर मोर्चा