ठाणे : अनधिकृत बांधकाम करणारे माफिया मग्रूर आणि मस्तवाल झालेले आहेत. अनधिकृत बांधकामातून मुंब्रा परिसरात झालेल्या दुर्घटना आणि त्यात झालेली जीवितहानी याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. पालिका अधिकारी हे मग्रूर आणि मस्तवाल झालेले आहेत. त्यांना मिळालेले पाठबळ याचा हा परिणाम आहे. अधिकारी स्पष्टपणे म्हणतात, आमचे कुणीही काही वाकडे करू शकत नाही. आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय भूमाफियांच्या पाठीशी पालिका अधिकारी नाहीत, हे मानने कठीण आहे. वास्तविक अनेक तक्रारी करूनही आजवर एकाही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, हे भयानक आणि लाजिरवाणे आहे. अनधिकृत बांधकाम वेळीच आवरणे गरजेचे आहे. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी सहाय्यक आयुक्त असो किंवा उपायुक्त असो त्यांची जबाबदारी निश्चित करून करणे आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
भूमाफियांनी एवढे निर्भीडपणे संरक्षण : पालिकेचे सहाय्यक आयुक्त आहेर यांच्या हल्ल्याबाबत आणि त्यांनी आमदार आव्हाड यांच्याबाबत व्हायरल झालेली क्लिप पाहता हा दुर्दैवी प्रकार आहे. त्या क्लिपमधील संवाद खरे आहेत, खोटे आहेत माहित नाही. पण जर खरे असतील तर, निश्चितच हा दुर्दैवी प्रकार नाही तर संतापजनक प्रकार असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. अनधिकृत बांधकामे ज्या पद्धतीने उभी राहत आहेत. पालिका अधिकारी त्यावर कारवाई करीत नाहीत, कारण यामध्ये आर्थिक देवाणघेवाण असल्याशिवाय भूमाफियांनी एवढे निर्भीडपणे संरक्षण पालिका अधिकारी देणार नाहीत हि वस्तुस्थिती आहे. एका आमदाराला अशा प्रकारे धमकावण्यात येत आहे हे गंभीर आहे. उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितले कि, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. आता चौकशी होणार आहे.
भूमाफिया आणि अधिकारी यांच्यावर कारवाई : तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सेनेचे उपजिल्हाध्यक्ष यांनी तर पालिका अधिकारी आणि आयुक्तांवर थेट आरोप केलेले आहेत. पालिका अधिकारी आणि आयुक्त हे भूमाफियांच्या हातातले बाहुले झालेले आहेत. तर पालिका अधिकारी हे रिमोटवर चालतात. अनधिकृत बांधकामात अधिकारी आणि आयुक्त हे सहभागी नाहीत, तर मग कारवाई का करण्यात येत नाही? असा सवालही संजय घाडीगावकर यांनी उपस्थित केला. राज्याच्या नगरविकास विभागाकडे तक्रार दाखल करून पुरावे दिले, तरीही या भूमाफियांवर आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. मग नगरविकास अधिकारी आणि विभाग हा भूमाफियांच्या मलिद्याचा लाभार्थी आहे काय? असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अनधिकृत बांधकाम प्रकरणी केलेला वहाळ हा चोरीला जातो. हे दुर्दैव आहे. आम्ही न्यायालयात या प्रकरणी दाद मागत आहोत. भूमाफिया आणि अधिकारी यांच्या मुसक्या आवळण्यात येणार आहे.
दररोज येतात शेकडो तक्रारी : ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात दररोज शेकडो तक्रारी अनधिकृत बांधकामाबाबत येत आहेत. यावर उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त हे कोणत्या प्रकारची कारवाई करत नाही, त्यामुळे आता नागरिक कंटाळलेला भ्रष्टाचाराला विरोध म्हणून न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. हा विषय अनधिकृत बांधकाम एवढा सुमित नसून अवैध होल्डिंग, अवैध पोस्टर्स हे दररोज लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रशासन म्हणून कोणत्याही प्रकारचा वचक राहिला नाही. त्यामुळे या सर्व अवैध गोष्टींना पाठबळ मिळत असल्याचे आरोप नागरिक करत आहेत.