ठाणे -उल्हासनगर महापालिकेमध्ये भाजपला धक्का देत, महाविकासआघाडीने सत्ता काबीज केली आहे. यात शिवसेनेच्या लिलाबाई अशान महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. मात्र, भाजपची सत्ता गेल्याने भाजपच्या माजी मंत्र्यांचा हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. माजी राजमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सरळ सरळ टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी यांना धडा शिकवला जाणार असल्याचे संकेत दिले.
हेही वाचा - नरेश म्हस्के.. शाखेचा बोर्ड लिहण्यापासून ते ठाण्याच्या महापौर पदापर्यंतचा प्रवास
ओमी कलानी यांनीही माजी राज्यमंत्री चव्हाण यांचे नाव न घेता त्यांना काय बिघडवयाचे ते बिघडवा, आम्ही घाबरत नाही. शिवाय उल्हासनगरात कलानीशिवाय पर्यायी नाही, असे वक्तव्य करून भाजपच्या माजी राजमंत्री चव्हाण यांना डिवचले आहे. तसेच आम्ही त्यांना मुह तोड जवाब देऊ, असे खुलेआम मत मांडून चव्हाण यांना आव्हान दिले. यामुळे येत्या काळात ओमी कलानी विरुद्ध माजी राज्यमंत्री चव्हाण यांच्यात सत्ता संघर्षाची लढाई पहायला मिळणार आहे.
टीम ओमी कलानीच्या पाठिंब्यावर भाजपने अडीच वर्ष सत्ता भोगली. मात्र, टीम ओमी कलानींच्या पंचम कलानी यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने टीम ओमी कलानीने महापौर निवडणुकीत भाजपचा वचपा काढला. त्यामुळेच शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना ४३ मते मिळून महापौरपदी निवडून आल्या. तर, निवडणुकीच्या २ दिवसापूर्वी भाजपमध्ये सर्व पक्ष विलीन करून टीम ओमी कलानींसह शिवसेनेवर माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजकीय दबाब आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. यात भाजपचे जीवन ईदनानी यांचा पराभव झाला.
विशेष म्हणजे भाजप पक्षाचा व्हीप झुगारून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या टीम ओमी कलानीच्या ८ नगरसवेकांनी शिवसेनेच्या पारड्यात मतं टाकली. यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात असून आता भाजपचा व्हीप झुगारून सेनेच्या पारड्यात मतदान करणाऱ्या नगरसवेकांवर भाजपचे वरिष्ठ नेते काय कायदेशीर कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.