ठाणे - विकासाचा नारा देत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आलेल्या भाजपचा, विकासाच्याच मुद्यांवर भाजपचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षांशी कार्यकर्त्यांनी हमरीतुमरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे 'सबका साथ सबका विकास'चा नारा कागदावरच राहिल्याची चर्चा मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये रंगल्याचे दिसून आले.
'विकासाचे वारे, किसन कथोरे' असे ब्रीद वाक्य घेऊन भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत मुरबाड मतदारसंघावर कब्जा केला. विशेष म्हणजे भाजप उमेदवार आमदार किसन कथोरे यांनी यंदाच्या प्रचारासाठी ‘विकास पर्व’ नावाने केलेल्या कामाची व करणार असलेल्या विकास कामांचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध करत मतदारांमध्ये प्रचारादरम्यान वितरित करायला घेतला. मात्र, आमदार किसन कथोरे यांचा विकास पर्व पाहून मुरबाड नगरपंचातील प्रभाग क्रमांक १२ माळीनगरमधील भाजप कार्यकर्ते भडकले. प्रचारासाठी आलेले भाजपचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्यासह तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, मुरबाड नगरपंचायतचे नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर यांना भाजपच्या कार्यकत्यांनी प्रचारादरम्यान अडवून आमच्या प्रभागात गेल्या ५ वर्षांपासून नागरी समस्यांचे निवारण आणि विकास कामे का नाही केलीत, असा सवाल केला. यावरून दोन्हीकडून हमरीतुमरी झाली.
त्यांनतर जिल्हध्यक्ष चोरघे यांनी त्यांची समजूत काढून माळीनगरच्या विकासकामांसाठी ३ कोटींचा निधी मंजूर झाला असून दिवाळीनंतर काम सुरु करणार असल्याचे आश्वसन दिले. विशेष म्हणजे मुरबाड नगरपंचायत समितीत भाजपची एका हाती सत्ता आहे. मात्र, या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने 'सबका साथ सबका विकास' चा नारा कागदावरच राहिल्याची चर्चा मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये रंगल्याचे दिसून आले.
हेही वाचा - ठाण्यात खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी; शिळफाटा रोडवर झाला अपघात