मीरा भाईंदर - शहरातील पत्रकार भाविक पाटील यांना नगरसेविका अनिता पाटील यांच्या भावाकडून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली आहे. याप्रकरणी काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
गुन्हा दाखल -
भाविक पाटील शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास वृत्तसंकलन करण्यासाठी पेनकर पाडा परिसरातून जात असताना पेनकर पाडा परिसरातील नगरसेविका अनिता पाटील यांचे भाऊ राजेश चौहान चारचाकी वाहन घेऊन भरधाव वेगाने जात होते. त्यावेळी त्याच्या मागे पत्रकार भाविक पाटील मोटारसायकलवर होते. पत्रकार भाविक पाटील यांना गाडी मागे घे अशा उर्मट भाषेत राजेश चौहानकडून सांगण्यात आले. त्यानंतर राजेश चौहान याने गाडीतून उतरून पत्रकार भाविक पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या संदर्भात शहरातील सर्व पत्रकार यांनी काशीमिरा पोलीस ठाण्यात धाव घेत राजेश चौहान यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा, धमकी, शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.
'झालेल्या हल्ला जाणीवपूर्वक'
राजेश चौहान याच्यावर याआधी सुद्धा जमीन बळकावने, अनधिकृत बांधकाम करणे तसेच मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पत्रकार भाविक पाटील यांच्यावर झालेला हल्ला जाणीवपूर्वक केला असून अशा मुजोर आणि सत्तेचा माज असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे, असे मत पत्रकार धीरज परब यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - ताडोबाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणा; मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक