ठाणे - दोन भावांमध्ये शुल्लक वाद झाल्याने मोठया भावाने लहान भावावर सुरीने हल्ला करून त्याला जखम केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बदलापुर पश्चिम येथील मांजर्ली परिसरात घडली आहे. हल्लेखोर भावाला बदलापूर पश्चिम पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - विवाहितेचा मृतदेह सापडला ठाण्याच्या वालधुनी नाल्यात, हत्या की आत्महत्या याबाबत संभ्रम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर कांबळे (३६) घरात झोपले असताना त्यांचा भाऊ सचिन (४०) बाहेर आरडाओरड करत असल्याचा आवाज त्यांना आला. त्यांनी भाऊ सचिन याला घरात बोलावून बाहेर आरडाओरड करू नको, असे समजावून सांगितले. त्यावेळी दोघा भावांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात सचिन याने घरातील किचनमधून सुरी आणून समीर यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार करून त्यांना जखमी केले. याप्रकरणी, सचिन कांबळे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पी.व्ही.पाटील करत आहेत.