ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे लॉकडाऊनचा फटका शेतकरी, व्यापारी, नागरिक, विविध व्यवसायसह हॉटेल, बार, रेस्टॉरंट या सर्वांनाच बसला आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या महामारीत दारूच्या व्यसनामुळे मनुष्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन तो विविध आजाराला बळी पडण्याची शक्यता आहे. ही सर्व परिस्थिती पाहता जिथं दारू मिळायची तिथं आता दवा आणि उपचार मिळणारे परिवर्तन दिसून आले आहे.
भिवंडी शहरातील पद्मानगर येथे 20 वर्षांपासून सुरू असलेला ममता बार आणि रेस्टॉरंट बंद करून त्या ठिकाणी आता 25 खाटांचे स्नेजोस-मल्टिस्पेशालीटी हॅास्पिटल सुरू केले आहे. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या हॅास्पिटलचे उद्घाटन ऑनलाईन करण्यात येणार आहे.
२० वर्षा पासून होता बार-
आबासाहेब निंबाळकर मानव विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब राजे निंबाळकर यांनी 20 वर्षापसून सुरू केलेल्या ममता बारला लॉकडाऊनमुळे ७ महिने टाळे होते. मात्र २० वर्ष जुना ममता बार आणि रेस्ट्रॉरंट बंद करून त्यांनी या ठिकाणी स्नेजोस-मल्टिस्पेशालीटी हॅास्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. या हॅास्पिटल स्पेशालीटीमध्ये मोफत रुग्णवाहीका सेवा, जीनेकोलॉजिकल शस्त्रक्रिया, लॅपरोस्कोपिक सर्जरी, कान, नाक, घसा तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रिरोग तज्ञ, फिजिओथेरपी, मधुमेह आदी सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारच्या सुविधा उपलब्ध होणार-
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या स्तुत्य उपक्रमाची दखल घेतली आणि शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास या रुग्णालयाचे ऑनलाईन उदघाटन केले. तसेच या रुग्णालयासाठी शासनाकडून हवी ती योजना, मदत गरिबांसाठी या हॉस्पिटलला मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केेले आहे.
आमदार महेश चौघुले यांच्या हस्ते फित कापून, नारळ वाढवून हॉस्पिटल सुरु केले आहे, यावेळी भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी, राष्ट्रवादीचे राजेश चव्हाण, आरपीआयचे बबन घोडके आदी उपस्थित होते या हॉस्पिटलमध्ये 25 बेड असून डॉ समीर लटके, डॉ तृप्ती दिनकर, डॉ पुनीत कुमार गुप्ता, डॉ श्यामसुंदर वर्मा, डॉ शशिकांत मशाल, डॉ स्नेहा वाघेला, डॉ शिवरंजनी पुराणिक, डॉ शाहिस्ता मन्सुरी अशी 10 डॉक्टरांची टीम असून 18 कर्मचाऱ्यांचा स्टाफ राहणार आहे. तसेच सर्व आरोग्य सुविधा असणाऱ्या या हॉस्पिटलमुळे परिसरातील तब्बल दोन लाख नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.