ठाणे - भिवंडी शहर महानगरपालिका प्रशासनाने कामगारांच्या बोनस रकमेतून युनियनच्या नांवाने परस्पर ५०० रुपये रकमेची कपात केल्याने महापालिकेतील हजारो कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
भिवंडी महानगर पालिकेत ३ हजार ८०० कामगार आस्थापनेवर असून या कामगारांना दिवाळी बोनस म्हणून पालिका प्रशासनाने ८ हजार १०० रुपये मंजूर केले आहेत. या अनुवाद रकमेचे वाटप २४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. मात्र, पालिकेने जाहीर केलेल्या बोनस रकमेतून ५०० रुपये कपात करण्यात आल्याने कामगार बुचकळ्यात पडले आहेत. या कामगारांनी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जनरल सेक्रेटरी पंकज गायकवाड यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पालिका आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्याकडे लेखी तक्रार करून कामगारांचे कपात करण्यात आलेले ५०० रुपये तात्काळ परत करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
भिवंडी शहर महापालिकेत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, म्युन्सिपल मजदूर युनियन, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड, लेबर फ्रंट युनियन, महाराष्ट्र्र राज्य मजूर जनरल कामगार युनियन, भारतीय कामगार सेना, अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, शासकीय वाहन चालक संघटना मंत्रालय, मुंबई, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, मुंबई मजदूर संघ, भारतीय कामगार संघटना आदी १२ कामगार संघटना कार्यरत आहेत. या कामगार संघटनांच्या कृती समितीने पालिका प्रशासनाला एका पत्राद्वारे प्रत्येक कामगारांचे ५०० रुपये कपात करून सुमारे १७ लाख रुपये कामगार संघटनांच्या कृती समितीकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे.
मात्र, पंकज गायकवाड यांनी लेखी हरकत उपस्थित करताच पालिका प्रशासन देखील अडचणीत सापडले आहे. कामगारांचे कपात करण्यात आलेले ५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात दोन दिवसात वर्ग केले जातील, असे आश्वासन पालिका आयुक्त प्रविण आष्टीकर यांनी आज (गुरुवार) पंकज गायकवाड यांना दिले आहे.