ठाणे - भिवंडी महापालिका महापौर पदासाठी फोडाफोडीचे राजकारण करत कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील ८ मतांनी विजयी झाल्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दोन महिन्यात भिवंडीचा विकास दिसणार असून त्यानंतर समजेल की, विकास काय असतो, असे बोलून त्यांनी भाजप आणि फुटीर काँग्रेस नगरसेवकांचे आभार मानले.
हेही वाचा - माथाडी कामगारांच्या १०० कोटींच्या ठेवी लाटल्या? सीबीआय चौकशीची मागणी
२०१२ च्या महापौर निवडणुकीची पुनरावृत्ती -
भिवंडी महानगरपालिकेच्या आज पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा विलास पाटील आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रिषिका पप्पू राका यांच्यात थेट लढत झाली. त्यामध्ये ८ मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. विशेष म्हणजे २०१२ मध्येही कोणार्क विकास आघाडीकडे अवघे ६ नगरसेवक असतानाही त्यांनी काँग्रेसचे नगरसेवक फोडून महापौर पदाची निवडणूक जिंकली होती. त्यावेळीही प्रतिभा पाटील या पहिल्यांदा महापौर झाल्या होत्या. आता तोच पाढा २०१९ च्या म्हणजे आज झालेल्या निवडणुकीत कोनार्क आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांनी गिरवला.
यावेळी तर अवघे ४ नगरसेवक कोणार्क आघाडीचे असताना भाजप, रिपाई, समाजवादी, अपक्ष आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावून बहुमताचा ४६चा आकडा पार करत ४९ मते मिळवत महापौरपद पटकावले. त्यामुळे काँग्रेसकडे स्वतःचे ४७ नगरसेवक आणि शिवसेनेचे १२ नगरसेवक असे बहुमतापेक्षा १३ नगरसेवक जादा असूनही त्यांचा ८ मतांनी पराभव होतो ही आश्चर्याची गोष्ट आहे.