ठाणे Bhiwandi Fire : उशा बनवणाऱ्या कापसाच्या गोदामाला भीषण आग लागल्यानं माय लेकाचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना भिवंडी तालुक्यातील वळपाडा इथल्या पारसनाथ कंपाऊंडच्या पहिल्या मजल्यावर मंगळवारी रात्री घडली. शकुंतला रवी राजभर आणि प्रिन्स राजभर असं आगीत होरपळून मृत्यू झालेल्या माय-लेकाची नावं आहेत. आग लागल्यानंतर सगळे बाहेर पळाले. यावेळी तीन वर्षाचा चिमुकला गोदामातच राहिल्यानं त्याला वाचवण्यासाठी शकुंतला या गोदामात गेल्या होत्या. मात्र मुलाला वाचवताना चिमुकल्यासह त्यांचाही आगीत होरपळून अंत झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुलाला वाचवण्यासाठी गोदामात गेली होती आई : कंपनीत शॉर्ट सर्किटनं आग लागल्यानंतर गोदामात एकच धावपळ झाली. या आगीची माहिती मिळताच गोदामात काम करणारे महिला व पुरुष कामगार बाहेर पळाले. त्यामध्ये शकुंतला यासुद्धा होत्या. परंतु त्या बाहेर पडल्यावर त्यांच्यासोबत आलेला तीन वर्षांचा चिमुकला प्रिन्स नावाचा मुलगा आतमध्ये राहिल्याचं लक्षात आलं. त्यामुळे शकुंतलादेवी पुन्हा आतमध्ये मुलाला वाचवण्यासाठी गेल्या होत्या. मात्र भीषण आगीत चिमुकल्या प्रिन्ससह त्यांचाही होरपळून मृत्यू झाला.
पाण्याची कमतरता असल्यानं आग विझवण्यात अडचण : घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यानं आग विझविण्यात अडचण येत होती. अखेर खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करुन आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान तीन तासापासून शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी छतावरील स्लॅब तोडून आग विझवण्यात यश मिळवले. यावेळी गोदामाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बाथरुमजवळ आई आणि चिमुकल्या प्रिन्सचा मृतदेह अग्निशमन दलाला आढळून आला.
दोन्ही मृतदेह पाहिल्यानंतर घटनास्थळावर हळहळ : घटनास्थळी नारपोली पोलीस व तहसीलदार कार्यालयातील अधिकारी दाखल होऊन त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. दोन्ही मृतदेह भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. घटनास्थळावर आई आणि चिमुकल्याचे मृतदेह पाहून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
हेही वाचा :