ठाणे - लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू झाली आहे. या बरोबर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आयाराम गयारामांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भिवंडी मतदारसंघातून काँग्रेसने अद्याप उमेदवार निश्चित केला नाही. या जागेसाठी शिवसेनेचा एक मोठा नेता काँग्रेसकडून इच्छुक असल्याची चर्चा झडत आहे. त्या पार्श्वभूमीवर भिवंडी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे.
भिवंडी मतदार संघासाठी काँग्रेसकडून ६ पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार योगेश पाटील, विश्वनाथ पाटील, राकेश पाटील, छगन पाटील, निलेश सांबरे, आर. सी. पाटील यांची नावे चर्चेत आहेत. ही नावे जिल्हा काँग्रेस समितीकडून केंद्रीय निवडणूक समितीला पाठवण्यात आली आहेत. यावर निर्णय येण्याचे बाकी आहे.
दरम्यान, शिवसेना नेते सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी ते दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना भेटून आल्याचेही सांगण्यात येत आहे. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून त्यांच्या नावाची चाचपणीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अल्पसंख्यक विभागाचे शहराध्यक्ष तुफेल फारुकी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस पक्षात एवढे उमेदवार इच्छुक असताना आयात उमेदवार नको, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.