ठाणे - बालिका दिन साजरा करण्याची अनोखी पद्धत ठाण्यात सुरु करण्यात आली आहे अंगनवाडी सेविकांनी पुढाकार घेवून ठाण्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या प्रयोगाची सुरवात केली आहे. ठाण्यातील येऊर संजय गांधी उद्यान येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने अंगणवाडी सेविकांनी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.
हेही वाचा - विक्रोळीत 'बेटी बचाव बेटी पढाओ'चा आवाज घुमला
बालिका दिनानिमित्त विभागातील लहान मुलींच्या नावाने प्रत्येकीच्या पालकांना रोपटे देण्यात आले, ज्याचे रोपण मुलींना सोबत घेऊन या वेळी करण्यात आले. अंगणवाडी मधील बीट क्रमांक चार इंदिरानगर सर्व सेविका व मदतनीस यांनी येऊर येथील वनक्षेत्र अधिकाऱ्यांसमवेत वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची रोपटी लावली. एकात्मिक बाल विकास प्रकल्पातर्फे २१ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान सप्ताह साजरा होणार असून विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. मुख्य सेविका मनीषा विचारे यांनी ही माहिती दिली. तसेच, यावेळी 'झाडे लावा झाडे जगवा' व 'बेटी बचाव बेटी पढाव' असा नारा देण्यात आला.
या झाडांची पुढील जबाबदारीदेखील त्यांचीच
हा प्रयोग हा नुसता वृक्षारोपणासाठी नव्हता तर, या झाडांचा आयुष्यभर संगोपन करण्याची सुरुवात या प्रयोगानिमित्त झालेली आहे. या झाडाला आपल्या पाल्याचे नाव देऊन त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी यावेळी पालकांना देण्यात आली आणि पालकांनी ती आनंदाने घेतलीदेखील. अशा प्रयोगांमुळे कमी होणारा जंगलपट्टा वाढण्यासाठी नक्कीच मदत मिळणार आहे.
हेही वाचा - मुंबईतील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट होणार - महापौर