ठाणे - शहरातील जांभळी नाका येथे बाळ गोपाळ मित्र मंडळ, नारळवाला चाळ यांच्या वतीने नेत्रदानाचा संदेश देत तुळशी विवाह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नेत्रहीन मुले सहभागी घेतला.
नेत्रदान या संकल्पनेबाबत आपल्या समाजात अद्याप मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज आहे. या संकल्पनेचा म्हणावा तितकासा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. नेत्रदानाचा संकल्प सोडण्याअगोदर या विषयाची गरज आणि आपल्याला त्यात देता येऊ शकणारे योगदान या मुद्द्यांविषयी समाजाच्या तळागाळात संदेश पोहोचला तर मोठ्या प्रमाणावर अंधत्व निवारणासाठी चालना मिळू शकते. तसेच मृत्यूनंतर नेत्रदान करणे सरकारने बंधनकारक केले तर देशात कोणीही अंध राहणार नाहीत, अशी भावना यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास ढमाले यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - घोडेबाजार होणार नाही याची राज्यपालांनी दक्षता घ्यावी - नवाब मलिक
नेत्रदान केले तर एखाद्याला दृष्टी मिळू शकते, यासाठी नेत्रदान करा, असा संदेश देण्यासाठी विलास ढमाले यांच्या बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या वतीने तुळशी विवाह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नेत्रहीन मुलांनी सहभाग घेतला. या तुळशी विवाहाच्या माध्यमातून एकाच दिवसात सुमारे १२८ नेत्रदानाचे फॉर्म भरण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर, जिव्हाळा महिला मंडळाच्या अध्यक्ष मंजिरी ढमाले आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. यंदा या तुळशी विवाहाचे ७९ वे वर्ष असल्याने नेत्रदानाचा संदेश देण्यात आला.
हेही वाचा - गोंदियात मैत्रीच्या नात्याला कलंक; धारदार चाकूने मित्राची निर्घृण हत्या