ठाणे - ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शहापूर तालुक्यातील टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्र ९ वर्षांपासून एका पडक्या उपकेंद्राच्या इमारतीत सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या आरोग्य केंद्रात विविध आजारांवर उपचार होत नसल्याने ग्रामीण परिसरातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असल्याने आरोग्य विभागाने या आरोग्य केंद्राची दुरुस्तीकरून यामध्ये विविध आजारांवर उपचार सुरू करावे, अशी मागणी या भागातील गावकऱ्यांनी केली आहे.
सर्वात मोठा आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूरपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या टेंभा या परिसरासह आजूबाजूच्या रुग्णांच्या नातेवाईकांची परवड थांबावी, त्यांच्या रुग्णांना तातडीने प्राथमिक उपचार मिळावे, यासाठी २०१२ साली 'टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्राची' उभारणी करण्यात आली आहे. परंतु हे प्राथमिक आरोग्य केंद्र आजही उपकेंद्राच्या पडझड झालेल्या इमारतीमध्येच गेल्या ९ वर्षापासून कार्यरत आहे. या आरोग्य केंद्रा अंतर्गत ३० गावे व ५८ आदिवासी पाडे येतात. तर २ वैद्यकीय अधिकारी, ११ परिचारिका, १० आरोग्य सेवक, १ महिला आरोग्य सेविका असे २४ आरोग्य कर्मचारी असून त्यांनाही अनेक समस्यांना तोंड देत रुग्णांवर उपचार करावे लागत असल्याचे दिसून आले आहे.
शालेय इमारतीत ओपीडी
टेंभा या उपकेंद्राला लागून असलेल्या बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या एका अंगणवाडी व शालेय इमारतीत ओपीडी सुरू असते. याठिकाणी पुरेशी जागा नसल्याने रुग्णांना दाखल करून घेणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र जावे लागते. विशेष म्हणजे गरोदर महिलांच्या प्रसूतीसाठी अद्यावत खोली देखील नाही. तसेच आरोग्य केंद्राची इमारत पडकी असल्याने डॉक्टर व परिचारिकांना राहण्याची व्यवस्था नसल्याचे पुढे आले आहे.
तरीही आरोग्य सेवेचे कर्तव्य
आरोग्य केंद्राच्या एकाच खोलीत औषधांचा साठा, त्याचठिकाणी औषधांचे वाटप, डॉक्टरांची ओपीडी सुरू असते. अशा अनेक समस्यांचा सामना करत आरोग्य सेवेचे कर्तव्य पार पडावे लागत असल्याचे दिसून आले. तर आरोग्य केंद्रातील शौचालयाची देखील दुरावस्था झाली आहे. या सर्व समस्यांवर आरोग्य विभागाने तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे, असे स्थानिक सरपंचांनी सांगितले आहे. गावालगत आंबिवली येथील गावठाण जागेत सुसज्ज इमारत होऊ शकते. परंतु शासनाच्या उदासीनतेचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. याविषयी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा -नांदेड जिल्ह्यातही जाणवले भूकंपाचे धक्के; नागरिकांनी घाबरू नये, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन