ठाणे - गर्दीच्या ठिकाणी कोरोनोचा प्रसार झपाट्याने होत असून रुग्ण आढळत असल्याने जिल्हाधिकारी, पालिका प्रशासनाने प्रसंगावधान अंगिकारले आहे. त्याचप्रमाणे ठाणे पोलीस आयुक्तालयात हजारो नागरिकांची विविध कामानिमित्त ये-जा असते. त्याला थांबविण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणेकरांना गरज असेल तरच मुख्यालयात या, अन्यथा फोन, पत्र आणि ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्याबाबत पोलिसांच्या गाडीतून नागरिकांना स्पीकरवरुन संदेश देण्यात येत आहे.
ठाणे पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे पोलीस मुख्यालय आदी कार्यालयामध्ये विविध कामासाठी जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. सध्याच्या स्थितीत कोरोनाचे सावट असून गर्दीच्या ठिकाणी कोरोना बाधितांकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महत्वाच्या कामासाठी नागरिकांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात गर्दी न करता पोलीस आयुक्तालयात येणे टाळावे. तसेच आवश्यक असल्यास फोन, पत्र किंवा ईमेलद्वारे संपर्क साधावा, गरज असेल तरच घराच्या बाहेरही पडावे असा संदेश पोलीस वाहनातून ठाणे पोलीस स्पीकरवर नागरिकांना देत आहेत.
हेही वाचा - केडीएमसी कर्मचाऱ्यांसह पोलिस-आरोपींना 2 हजार मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वितरण
त्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय अन्य कामांसाठी ३१ मार्चपर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयात सर्वसामान्य नागरिकाला नो एंट्री राहणार आहे. तलाव पाली परिसरात वाहनाच्या स्पिकरच्या माध्यमातून नागरिकांना जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना गर्दी टाळण्यासाठीची विनंती पोलीस करत आहेत. अशाच प्रकारे सर्व गर्दीच्या ठिकाणी आवाहन करण्यासाठी सर्वच पोलिसांना वारिष्ठांनी आदेशही दिले आहेत.
हेही वाचा - गुढी पाडव्याला दिसणार नाही बाजारात आंबा...