ठाणे - महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील परिचारिकांना कामावरून काढल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या मनसे नेते अविनाश जाधव यांना ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यानंतर त्यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. मात्र, मला ज्या अधिकाऱयांनी खोटया गुन्ह्यात अडकवले त्यांना निलंबित करत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही, असे अविनाश जाधव यांनी सांगितले.
महापालिकेच्या कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना वेतन न दिल्याने आणि कामावरून कमी केल्यामुळे मनसे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले होते. दरम्यान, शासकीय कामात अडथडा आणल्याचा ठपका ठेवत त्याच्यांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी कापूर बावडी पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, त्यांना ठाणे सत्र न्यायालयात यासंदर्भात सुनावणी सुरु होती. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तळोजा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 15 हजार रुपये जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितले. यानतंर अविनाश जाधव यांना तळोजा कारागृहाबाहेर घेण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गेले होते जामिनावर बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
न्यायालयावर आमचा विश्वास असून, अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे जनतेसाठीही लढाई होती पुढे देखील अशीच लढाई जनेतेसाठी सुरू राहणार असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले. तर, हा विजय जनतेचा असून न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता. अविनाश जाधव यांनी जनतेसाठी आंदोलन केले होते त्यामुळे हा जनतेचा आणि आमचा विजय आहे असे मनोगत मनसे कार्यकर्त्यांनी वक्त केले.