ठाणे - महापालिकेच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर धडक कारवाई केलेली आहे. त्यामुळे फेरीवाल्याने हल्ला केल्याचे भासविण्यात येत असले तरीही हा हल्ला फेरीवाल्यांच्या कारवाईचा नाही. तर अनधिकृत इमारती उभारणाऱ्या माफियांचा हा पूर्वनियोजित हल्ला असल्याची प्रतिक्रिया ज्युपिटर रुग्णालयातून आठ दिवसांनी बाहेर पडलेल्या पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी दिली. पिंपळे यांच्या या आरोपाने आता ठाण्यात खळबळ उडाली आहे.
ठाण्याच्या खासगी ज्युपिटर रुग्णालयात उपचाहर घेतल्यानंतर तब्बल आठ दिवसांनंतर पालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन्ही हाताला प्लास्टर घेऊन दोन बोटे गमावलेल्या कल्पिता पिंपळे या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहताच भावूक झाल्या होत्या.
काय म्हणाल्या कल्पिता पिंपळे..?
यापूर्वी मी मानपाडा, घोडबंदर रोडवरील अनेक इमारतीवर कारवाई केली पाच व सात मजल्यांच्या इमारती तोडल्या आहेत. त्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाई झाल्यानंतरच आम्ही कारवाईच्या ठिकाणी पोहोचलो होतो. फेरीवाल्यांना माझ्यावर राग असता तर यापूर्वीच हल्ला झाला असता किंवा त्यांनी कारवाईच्या वेळीच गोंधळ घातला असता. मात्र, मी वाहनातून उतरल्यानंतर माझ्यावर हल्ला झाला. त्यामुळे हा हल्ला फेरीवाल्यांनी केलेले नाही तर अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांनी केलेला नियोजनबद्ध हल्ला आहे.
मी घाबरणार नाही तर पुन्हा धडाक्याने कारवाई करणार
अनधिकृत बांधकाम किंवा फेरीवाल्यांवर कारवाई करणे हे माझे कामाचं आहे. पण, माझ्यावर अशा प्रकारे हल्ला केला. माझी दोन बोटे गेली. जर माझा जीव गेला असता तर माझा मुलगा अनाथ झाला असता, माझ्या भावाला बहीण आणि माझ्या आईला मुलगी कुठून मिळाली असती, असे भावूक विधान केले. मी घाबरणार नाही. पुन्हा एकदा बरे होऊन धडक कारवाईस सुरुवात करणार असल्याचे आव्हानात्मक उद्गार कल्पिता पिंपळे यांनी काढले.
भेट आणि विचारपूस करणाऱ्या सर्वांचे मानले आभार
ज्युपिटर रुग्णालयातून आठ दिवसानंतर रुग्णालयाच्या बाहेर पडलेल्या जखमी सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी भावूक होऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यासोबतच हल्ला करणाऱ्या अज्ञातांना पुन्हा धडक कारवाईचे आव्हानही दिले. त्यांनी पालिका आयुक्त, नगरविकासमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर यांनी त्यांना मदतीचा दिलेला हात. राज ठाकरे, मंत्री जितेंद्र आव्हाड, सर्व टीएमसीचे सहकारी अधिकारी, ज्युपिटर रुग्णालयातील वैद्यकीय पथक यांसह अनेकांचे आभार मानले. प्रसारमाध्यमांनी हल्ल्याच्या बातमीला न्याय दिला त्याबद्दल प्रसारमाध्यमाचेही आभार मानले.
हेही वाचा - खळबळजनक : मीरा रोड परिसरात एकाच घरात आढळले तीन मृतदेह