ठाणे: या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी गुंडाची नावे आहेत. खळबळजनक बाब म्हणजे ठाणे पोलीस आयुक्त कार्यलयात अंतर्गत ३५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात १४८ पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहे. यामुळे पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.
पोलीस दलात खळबळ: उल्हासनगर शहरातील कँम्प नंबर ३ परिसरात शासकीय मध्यवर्ती रुग्णालय आहे. या रुग्णालयात मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण कोकितकर हे सुरक्षेसाठी मध्यवर्ती रुग्णालयात ड्युटीवर होते. काल रात्री सव्वा बाराच्या सुमारास आरोपी आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे यांच्यामध्ये मध्यवर्ती रुग्णालयात वाद सुरू होता. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण कोकितकर यांनी या वादात हस्तक्षेप केला असता, दोन्ही आरोपींनी त्यांच्या अंगावर अचानक धाव घेत शर्ट पकडत त्यांना मारहाण केली. मारहाण करत असतानाच कोणी तरी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
दोन वर्षात १४८ हल्ले : ठाणे पोलीस आयुक्त कार्यलया अंतर्गत पाच पोलीस परिमंडळ असून यामध्ये ३५ पोलीस ठाण्याच्या समावेश आहे. या ३५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०२१ आणि २०२२ या दोन वर्षात १४८ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. २०२१ मध्ये ९४ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले होते. हल्ला करणारे ८९ हल्लेखोरांना अटक करण्यात आली होती. तर ५ हल्लेखोर अद्यापही फरार आहेत. तर सन २०२२ मध्ये ५४ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले होते. हल्ला करणारे ५२ हल्लेखोरांना अटक करण्यात आली होती. तर २ हल्लेखोर अद्यापही फरार आहेत. एकदंरीतच २०२३ मध्येही पोलिसांवर हल्ल्याचे सत्र सुरूच असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
दोन्ही गुंड पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार : मध्यवर्ती रुग्णालयात घडलेल्या घटनेचा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपी गुंडांना अटक करण्यात आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे अटक केलेल्या दोन्ही गुंडांची गुन्हेगारी पार्श्ववभूमी पाहता, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. आकाश गायकवाड हा सराईत आरोपी असून त्याच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.