ठाणे - सहाय्यक पोलीस निरीक्षकाला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. संदीप बोराडे असे लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. संदीप बोराडे कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. लाचखोरीच्या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.
लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोराडे याने अदाखलपात्र गुन्ह्यातील तक्रारादार विरुद्ध कारवाई न करणे. तसेच यापुढे सहकार्य करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता. मागणी केलेल्या लाचेच्या रकमेपैकी नऊ हजार रुपये लाचखोर संदीप बोराडे याने घेतले होते. त्यानंतर त्रस्त तक्रारदाराने याप्रकरणी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारच्या सुमाराला पोलीस ठाण्यातच सापळा रचून उर्वरित लाचेचे एक हजार रुपये घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी संदीप बोराडे याला रंगेहाथ अटक केली आहे.