ठाणे - केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन भिवंडीत करण्यात आले आहे. मात्र, या सभेला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवून खासदार ओवैसींची सभा उधळून लावू, असा निर्धार पत्रकार परिषदेत केला होता.
यावर एमआयएमचे भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी तर 'कोणाच्या बापात दम असेल तर त्यांनी ओवैसींची सभा रोखून दाखवावी', असे प्रतिआव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांना दिले होते. त्यामुळे या सभेवरून भाजप-एमआयएम यांच्यात आमनासामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए, एनसीआर, एनआरसी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी खासदार असदुद्दीन ओवैसी देशभरात सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर भिवंडीतही 27 फेब्रुवारीला टावरे स्टेडियम येथे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या जाहीर सभेला भाजपचा विरोध असून आपण ओवैसींची भिवंडीतील जाहीर सभा उधळून लावू, त्यासाठी भिवंडी शहरातील मुख्य नाक्यावर भाजपचे कार्यकर्ते उभे ठेवून खासदार ओवैसीची नाकाबंदी करू अशी, भूमिका घेत भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी घेतली आहे.
भाजपच्या या विरोधी भूमिकेनंतर एमआयएम शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनीही आज 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, 27 फेब्रुवारीला खासदार ओवैसी यांची होणारी सभाही पूर्वनियोजित असून या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. कोणाच्या बापात दम असेल तर त्यांनी खासदार ओवैसी यांची सभा रोखून दाखवावी, असे प्रतिआव्हान भाजपला दिले आहे.
दरम्यान, एकीकडे एमआयएमने भाजपाला प्रतिआव्हान दिल्यामुळे भिवंडीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भिवंडी पोलीस प्रशासन खासदार ओवैसींच्या जाहीर सभेबाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे पोलीस प्रशासनापुढे आव्हान असणार आहे.