ठाणे - राज्यात लोकसभा निवडणुकीत तुल्यबळ राजकीय आघाड्यांसमोर तगड आव्हान उभे करणाऱ्या वंचित आघाडीने भिवंडी लोकसभा निवडणुकीत राज्यातील उमेदवारापैकी उच्च शिक्षित असलेल्या डॉ. अरुण सावंत यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे भिवंडी लोकसभेत १५ टक्के आगरी समाज असल्याने भाजप व काँग्रेसने आगरी समाजाचे उमेदवार दिले आहेत. मात्र, ३७ टक्के कुणबी, दलित-मुस्लीम ३० टक्के या गणिताचा आधार घेत वंचित आघाडीने कुणबी समाजाचे डॉ. सांवत यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.
मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अरुण सावंत यांचे मुळगाव भिवंडी आहे. सांवत भिवंडी लोकसभा क्षेत्रातील वाडा तालुक्यातील असल्याने त्यांच्या विद्वत्तेला पसंती देत, पक्षश्रेष्टींनी त्यांना राजकारणात उतरवले आहे. सावंत यांची पार्श्वभूमी पाहता विज्ञान, पर्यावरण, या विषयात संशोधनपर कार्य करत त्यांनी विविध विषयांवर २३ प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली आहे. ते मुंबई व जयपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू असताना शासनाने त्यांच्या सूचनांचा स्वीकार करत त्यांचा सन्मान केला आहे. तर त्यांनी 'शिसे विरहित पेट्रोल' हे संशोधन केले आहे. तसेच त्यांनी आजपर्यंत देश-विदेशात असंख्य अभ्यास दौरे करून व्याखाने दिली आहेत. त्यामुळे वंचित आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी विचारपूर्वक त्यांना भिवंडी लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान केल्याची माहिती डॉ. सांवत यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना दिली.
विद्वत्तेचा समाजासाठी उपयोग व्हावा, कारण सर्व समस्यांचे निराकरण करायचे असेल तर शिक्षण हेच विकासाचे मूळ आहे. पर्यावरण, शेती, शिक्षणाचे प्रश्न गंभीर का झालेत याचा अभ्यास केल्यास त्यामध्ये वंचित समाज उपेक्षित राहिला असल्याचे दिसते. या निवडणुकीत काहीतरी वेगळे करून दाखविण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. वंचित बहुजन आघाडीतील सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचेही त्यांनी सांगितले.