ठाणे - कोरोनामुळे अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यातच लहान मुलांसाठी मास्क सहसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लहान मुलांचे मास्क बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या जात आहे. त्यात मास्क वापरणे अनिवार्य आहे. तसेच लॉकडाऊनमुळे अंगणवाड्या बंद आहेत. घरी बसून करायचे काय? त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी मास्क बनवायचे ठरविले. त्यानुसार ठाण्याच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सर्वच अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांचे मास्क बनविण्याची कार्यशाळा घेऊन अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण दिले जात आहे. मास्क तयार झाल्यानंतर अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना दिले जात आहे. तसेच कोरोनापासून आपल्या पाल्याची सुरक्षा कशी करायची? याबाबत पालकांना माहिती दिली जात आहे.