ठाणे - शहरात आज पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ठाण्यातील पाचपाखाडी भागातील मैथिली आणि पारिजात या इमारतींच्यामध्ये असलेले मोठे झाड उन्मळून पडले. त्यामुळे जवळच असलेल्या अमृत सोसायटीच्या खाली असेलल्या दोन दुकानांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ब्लेडरच्या सहाय्याने झाड कापून रस्ता मोकळा केला.
ठाणे शहरात अशी अनेक जूनी झाडे आहेत. या झाडांच्या चारही बाजूला सिमेंटच्या इमारती उभ्या केल्या गेल्यामुळे ही झाडे कशी-बशी तग धरुन उभी आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही जूनी झाडे उन्मळून पडत आहेत. ठाण्यात दरवर्षी झाडे पडल्याने अनेक वाहनांचे आणि इमारतींचे नुकसान होते. आत्तापर्यंत झाड पडून दोघांचा मृत्यू झाल्याचीही नोंद आहे. महानगरपालिका प्रशासन झाडे तोडणे आणि फांद्या छाटण्याचे काम करते मात्र, तरीही असे अपघात होतच असतात.