मीरा भाईंदर (ठाणे) - मीरारोड परिसरात बेडरूममध्ये लागलेल्या आगीमुळे वृद्ध महिलेचा गुदमरून मृत्यू झाला. सृष्टी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. घरातील एक सदस्य जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सृष्टी परिसरातील सेक्टर ०३ मधील वृषापर्व इमारतीमधील रूम नंबर ७२ मध्ये पहाटे ५ वाजता शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. यामध्ये गीता आनंद (वय ७०) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या फ्लॅटमध्ये अनिल आनंद (वय ७५) तर त्यांची पत्नी गीता आनंद (वय ७०) राहत आहेत. पहाटे ५ वाजता एसीच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.
आगीची माहिती मिळताच मीरा भाईंदर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवले. घरात प्रवेश करताच सदर महिला बेडरूममध्ये मृत अवस्थेत पडून असल्याचे आढळले. तर, यामध्ये अनिल आनंद हे जखमी झाले आहेत. एसीच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे बेडरूम मध्ये धूर पसरला आणि त्यात गुदमरून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घरात हे दोघेच वृद्ध व्यक्ती राहत होते. त्यांचा मुलगा सिंगापूरला नोकरी करत आहे. तर मुलगी मीरारोड परिसरातच राहत आहे.
‘आग लागली असल्याची माहिती आम्हाला मिळाली,घटनास्थळी ताबडतोब गेलो या मध्ये वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती जखमी आहे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. आग शॉर्टसर्किट मुळे लागली होती,’ अशी प्रतिक्रिया काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी ईटीव्ही भारतला दिली.