ठाणे: या बैठकीत राष्ट्रवादीच्या काही नगरसेवक उपस्थित नसल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत ठाण्यातील राष्ट्रवादीच्या 34 पैकी 13 नगरसेवक गैरहजर राहिले होते. तर या बैठकीला अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. आगामी ठाणे पालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाने जोरदार प्रयत्न केले आहेत. ठाण्यात नवीन राजकीय खेळी खेळण्यास सुरूवात केली आहे.
नगरसेवक फुटीच्या वाटेवर: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातील माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या गळाला लागले जाणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडण्याच्या प्रयत्न आहे. आव्हाड यांच्या मतदरसंघांसह ठाणे शहरातील काही नगरसेवक फुटीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटात इनकमिंग जोर धरू लागला आहे. ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शिंदे गटाच्या टार्गेटवर आहे. ठाण्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडण्याच्या तयारीत शिंदे गट आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बैठक घेतली. सर्वच जण पक्षासाठी काम करत आहे.
जितेंद्र आव्हाडांना विचारा: पक्षाच्या नेत्यांनी बैठक बोलवली होती. यामध्ये ठाण्यातले माजी नगरसेवक उपस्थित होते. माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे पक्षाच्या कामानिमित्त दिल्ली येथे असल्याने ते येऊ शकले नाहीत. मात्र राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ आहेत. आगामी निवडणुकीत पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्व काम करणार आहेत, अशी माहिती आनंद परांजपे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यानी दिली. या संदर्भात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के यांची प्रतिक्रिया घेतली. तेव्हा नगरसेवकांच्या अनुपस्थितीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनाच विचारावे लागेल, असा टोला मस्के यांनी लगावला.
नजीब मुल्ला शरद पवारसोबत दिल्लीत: राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नजीम मुल्ला यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील माजी नगरसेवकांनी हजेरी लावली होती. तर मुंब्र्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावून त्यावर मुल्ला यांना शुभेच्छा दिल्ल्या होत्या. दरम्यान त्यांनतर मुल्ला हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा होती. मंगळवारी अजित पवारांनी घेतलेल्या बैठीकित मुल्ला उपस्थित नव्हते. तर मुल्ला यांनी आपल्या सोशल मीडियावर शरद पवारांसोबत दिल्लीत असल्याचे एक पोस्ट केला आहे.