ठाणे - ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमच्या भिवंडी शहराध्यक्षपदी खालिद गुड्डू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमआयएमचे ठाणे जिल्हाध्यक्ष आयाज गुलजार मौलवी यांनी एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या मान्यतेने शनिवारी त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत खालिद गुड्डू यांनी शहरातील काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. शेवटच्या क्षणाला त्यांचा निसटता पराभव झाला असला, तरी शहरात फारसे वर्चस्व नसतानाही देखील खालिद गुड्डू यांच्या जनसंपर्कामुळे एमआयएमने शहरात आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.
खालिद गुड्डू यांच्या विधानसभा निवडणुकीतील कार्याची दखल घेत एमआयएमचे सुप्रिमो खासदार असदुद्दीन ओवेसी व एमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी खालिद यांना अध्यक्षपदाची भेट दिली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शहरातील एमआयएम कार्यकर्त्यांसह खालिद गुड्डू यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, "एमआयएमच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडणार असून भविष्यात भिवंडीकरांच्या हितासाठी व हक्कासाठी आपण सदैव तत्पर राहून लढणार आहोत" अशी प्रतिक्रिया एमआयएमचे नवनियुक्त भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष खालिद गुड्डू यांनी दिली आहे.
हेही वाचा : धुळे: एमआयएमने रोखली अनिल गोटे यांच्या विजयाची घोडदौड