ठाणे - सिनेअभिनेते भरत जाधव यांच्या 'सही रे सही' या नाटकाचा ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात प्रयोग होता. त्यावेळी येथील वातानुकूलीत यंत्रणा बंद होती. त्यामुळे भरत जाधव घामाघूम झाले. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्हिडीओ काढून फेसबुकवर पोस्ट केला होता. या पोस्टमुळे आता पालिका प्रशासनाला जाग आली आहे.
या घटनेनंतर ठाणे महापालिका सभागृह नेत्यांनी काशिनाथ नाट्यगृहला भेट देऊन नाट्यगृहाची पाहणी केली. तसेच सदर ठिकणी काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला. तर नाट्यरसिकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या दिवाळीतच या नाट्यगृहाची डागडुजी करण्यात आली होती. परंतु, येथे पुर्वी होती तशीच अवस्था असल्याने या ठिकाणी वातानकुलीत यंत्रणा सुरू नसल्याची तक्रार भरत जाधव यांनी केली आहे. त्यानंतर शहर अभियंता रवींद्र खडताळे यांनी संपूर्ण नाट्यगृहाची पहाणी करून सर्व यंत्रणा तपासली. तर, म्हस्के यांनी भरत जाधव यांना त्रास झाल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली असून यापुढे असा त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले आहे.