नवी मुंबई - कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. परंतु पनवेल परिसरातील शाळेकडून या नियमाला बगल देत विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. गुरुवारी पनवेल महापालिकेच्या हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदीर या शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून पुस्तकं वाटल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालक व विद्यार्थ्यांनी शाळेत गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचाही फज्जा उडालेला पाहायला मिळाला. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या काळात शाळेकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळले जात असल्याचे पनवेल परिसरात चित्र दिसून येत आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रासह ग्रामिण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. पनवेल परिसर रेड झोन मोडत असून, दररोज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरीच्या पुढे येत आहे. त्या अनुषंगाने पनवेल मनपा परिसरातील तसेच जि. प. शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा सुरु कराव्यात की नाहीत, या बाबत शासन द्विधा मनस्थितीत आहे. कोरोनाच्या काळात विद्यर्थ्यांना शाळेत येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. मात्र पनवेल परिसरातील शाळेकडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.
गुरुवारी पनवेल महापालिकेच्या हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदीर या शाळेत सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करुन पुस्तके घेण्यास बोलवण्यात आले होते. यावेळी सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तकाचे वितरण केले गेले. ही पुस्तके घेण्यासाठी पालक तसेच विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला होता. तसेच सॅनिटायझरचाही उपयोग करण्यात आलेला नव्हता. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शाळेत बोलवलेच कसे ? असा प्रश्न नागरिकाकडून विचारला जात आहे.
या बाबत प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब चिंमणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कॅमेऱ्यासमोर न येता आम्ही शासनाच्या नियमानुसार पुस्तक वाटत असल्याचे सांगितले. मात्र यासाठी पालकांना बोलवण्यात आले असता, त्यांच्यासोबत विद्यार्थीही आल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.