ठाणे - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सामान्य वाहन चालकांवर नेहमीच कारवाई होत असते. मात्र, पोलीस खात्यातील वाहन चालकांवरही आता वाहतूक नियम भंग केला म्हणून, पोलिसांनी कारवाई केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तांच्या निर्देशावरून शुक्रवारी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलिसांवरच कारवाई केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयासमोरच किमान 40 पेक्षा अधिक पोलिसांवर ई-चलनच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोना विषाणूचा परिणाम; शिंक चीनला अन् सर्दी जगाला...
सरकारकडून डिजिटल व्यवहाराला चालना दिली जात असल्याने ठाणे शहर वाहतूक विभागाने नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर ई-चलनद्वारे कारवाई सुरू केली आहे. रस्त्यावर अथवा सिग्नलवर एखाद्या वाहन चालकाने नियम तोडल्यास वाहतूक पोलीस वाद न घालता तत्काळ वाहनाचा फोटो काढून ई-चलन वाहन मालकाला पाठवून देतात. वाहनाच्या नंबरवरून वाहन धारकांचा छडा लावून हे ई-चलन पाठवले जात असून, हा दंड संबंधित वाहनचालकाने केव्हाही भरण्याची मुभा असते. त्यामुळे वादविवादाचे प्रमाण कमी झाले असले तरी पोलीस केवळ सर्वसामान्य वाहन चालकांवर कारवाई करीत असल्याची ओरड होत होती. याला छेद देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नियम मोडणाऱ्या सामान्यांसह पोलीस दादांवरदेखील ई-चलनचा बडगा उगारण्यात येत आहे.
शुक्रवारी कामानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयात कामकाजानिमित्त आलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली. ठाणे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक बाराते यांच्या पथकाद्वारे केलेल्या या कारवाईमध्ये सुमारे 40 हुन अधिक पोलीस कचाट्यात सापडले. ही कारवाई करत असताना त्या पोलिसांचा वाहन परवाना तसेच दुचाकी कोणाच्या नावावर आहे. याचीही तपासणी केली जात होती आपल्यावर कधीच कारवाई होणार नाही. अशा भ्रमात असलेल्या अनेक विनाहेल्मेट दुचाकीस्वार पोलिसांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत पकडण्यात आले अगदी गृह रक्षक दलाच्या जवान तसेच, पोलीस शिपाई आणि काही उच्चपदस्थ पोलीसही या कारवाई मध्ये सापडले.
हेही वाचा - महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना 15 एप्रिल पूर्वी पूर्ण करा - मुख्यमंत्री