ठाणे: आरोपीवरील गुन्ह्यांची जंत्री पाहून त्याला तडीपार करण्यात आले. सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५१, रा. चोळेगाव, ठाकुर्ली ) असे तडीपार केलेल्या टिकटॉक स्टारचे नाव आहे. आरोपी सुरेंद्र हा इंस्टाग्रामवर अनेक वादग्रस्त व्हिडीओ अपलोड करून तो व्हायरल करत असल्याने त्याचे ९० हजाराहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. त्यातच त्याला २५ ऑक्टोंबर २०२२ रोजी मानपाडा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील रक्कम त्याला परत देण्यासाठी बोलावले होते. संबंधित गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्णा गोरे यांच्याकडे होता. आरोपी सुरेंद्र हा त्यांच्या कक्षात २५ ऑक्टोंबरला दुपारी साडेअकरा आला होता. कक्षात पोलीस अधिकारी नसल्याचे पाहून आरोपी त्यांच्या खुर्चीत बसला. यानंतर त्याने स्वत:लाच पोलीस अधिकारी असल्याचे भासवत त्याने डायलॉगबाजीचा व्हिडिओ तयार करून तो इंस्टाग्रामवर अपलोड केला.
शास्त्रस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल : त्यानंतर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही गंभीर बाब मानपाडा पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यावेळी पोलीस शिपाई विनोद ढाकणे यांच्या तक्रारीवरून सुरेंद्र पाटीलवर विविध कलमांसह सायबर गुन्ह्यानुसार गुन्हा दाखल केला. यापूर्वी आरोपीने त्याच्याकडे असलेली परवानाधारक रिव्हाल्व्हर हातात घेऊन उंचावत फिल्मी स्टाईलने साथीदारांसोबत डान्स करतानाचाही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून व्हायरल केला होता. पोलिसांनी यामध्ये परवानाधारक रिव्हाल्व्हरच्या नियमाचे व अटीचे उल्लंघन केल्याने आर्म्स अक्ट्स नुसार गुन्हा दाखल केला.
दीड वर्षांसाठी तडीपार: मानपाडा पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली होती. तर दुसरीकडे पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिला नसल्याची चर्चा नेटकरी करताना दिसत होते. विशेष म्हणजे, आरोपी सुरेंद्रवर विविध पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर त्याच्या तडीपाराचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने त्याला दीड वर्षांसाठी ठाणे मुंबई, रायगड जिल्ह्यातून तडीपार केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी दिली आहे.
आरोपी गुन्हेगारी वृत्तीचा: आरोपी बादशाहवर नोव्हेंबर, 2022 मध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यानंतर तो गुन्हेगार असल्याचे समोर आले होते. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ७ गुन्ह्यांची नोंद होती. सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी (वय ५१, रा. चोळेगाव, ठाकुर्ली ) असे अटक आरोपीचे नाव होते. त्याच्याकडून 65 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
भोंदू बाबाच्या टोळीने घातला होता गंडा: आरोपी सुरेंद्र प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक असून तो इंस्टाग्रामवर अनेक वादग्रस्त व्हिडीओ अपलोड करून तो व्हायरल करत असल्याने त्याचे ९० हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. आरोपी सुरेंद्रला जून २०२२ मध्ये भोंदू बाबाच्या टोळीने ५ कोटी रूपयांचा पाऊस पाडतो, असे सांगत ५६ लाख रुपयांचा गंडा घातला होता. त्यावेळी आरोपी सुरेंद्र याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, कल्याण शीळ मार्गवरील दावडी रोडला असलेल्या कार्यालयावरच्या घरात पूजा करून इमारती भोवती ५ प्रदक्षिणा मारून येतो, असे सांगून भोंदूबाबांच्या टोळीने ५६ लाखांची रोकड घेऊन पळ काढला होता. त्यावेळी पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रभावीपणे वापर करून या फसवणूक प्रकरणातील भोंदूबाबासह सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळविले होते. सुरेंद्रकडून पळविलेली १९ लाख ९६ हजार रोख रक्कम परत देण्यासाठी कथित बादशहाला २५ ऑक्टोंबर रोजी मानपाडा पोलीस ठाण्यातील बोलावले होते.