ठाणे - केवळ पाचशे रुपयांच्या दारुच्या बिलावरून वाद होऊन एका तळीरामाने वाइन शॉपमध्ये घुसून मालकाला कात्रीने भोसकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी उल्हासनगरजवळ असलेल्या म्हारळ गावात घडली होती. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून कल्याण तालुका पोलिसांनी हल्लेखोर आरोपीचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
गोविंद वर्मा, असे अटकेत असलेल्या हल्लेखोर तळीरामाचे नाव आहे. तर लच्छु आहुजा (वय 45 वर्षे), असे गंभीर जखमी झालेल्या वाइन शॉप मालकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उल्हासनगरमध्ये रहाणारे लच्छु आहुजा यांचे देशी-विदेशी दारूविक्रीचे दुकान आहे. या वाइन शॉपमध्ये दोन दिवसांपूर्वी संध्याकाळच्या सुमारास आरोपी गोविंद वर्मा हा साथीदारांसह दारू खरेदीसाठी आला होता. त्यावेळी पाचशे रुपयांच्या बिलावरून मालक लच्छु आहुजा व आरोपी गोविंद यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन आरोपीने धारदार कात्री व हातोडी घेऊन वाइन शॉपमध्ये घुसला व त्याने मालकाच्या पोटात कात्री भोसकली. हे पाहून वाइन शॉपमधील इतर कामगारांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हातात कात्री आणि हातोडी असल्याने त्याच्या जवळ कोणी जाऊ शकले नाही. त्याने वाइन शॉपमध्ये तोडफोड सुरु केली होती.
दरम्यान, कल्याण तालुका पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरू केला. आज (दि. 30 सप्टें.) आरोपीला शहाड परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या नावे नागरिकांची लूट.. अधिकार नसतानाही क्लिनअप मार्शलकडून दंडवसुली, गुन्हा दाखल