ठाणे - निर्जनस्थळ असलेल्या मोकळ्या जागेत एका 28 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 25 एप्रिलला बदलापुरात घडली होती. या निर्घृण हत्येचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. मोबाइलवरून जास्तवेळ बोलण्याच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. समसूल हक गुलाम करीम, असे अटक आरोपी मित्राचे नाव आहे. तर प्रसाद जिंजुरके, असे निर्घृण हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे.
दारूची पार्टी करण्याच्या बाहण्याने नेऊन हत्या - मृत प्रसाद हा बदलापूर पूर्वेकडील सापेगाव परिसरात असलेल्या पोतदार सोसायटीत कुटूंबासह राहत होता. त्याच सोसायटीमध्ये आरोपी समसूलही पत्नी व दोन मुलासह राहतो. त्यामुळे दोघांची मैत्री होती आणि दोघेही पेंटरची कामे करत होते. त्यातच (दि. 24 एप्रिल ) रविवारी आरोपी मित्राच्या मोबाइलवरून मृत प्रसाद बराच वेळ बोलत होता. त्यावेळी आरोपीने त्याला माझ्या मोबाइलवरून बोलू जास्त नकोस म्हणून वाद घातला. त्यानंतर मृत प्रसादला दारूची पार्टी करण्याच्या बाहण्याने रविवारी रात्रीच्या सुमारास सोबत नेले. त्यानंतर आरोपी समसूलने प्रसाद डोक्यात दगड घालून त्याची हत्या करून फरार झाला.
हत्या करून आरोपी पळाला होता आंध्रप्रदेशला - दरम्यान, सोमवारी (दि. 25 एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास जुवेलीकडून चामटोली गावाकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात प्रसादचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरमधील शासकीय रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांचा तपास सुरू असतानाच गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घटनेच्या रात्री दोघे मित्र सोसायटीमधून सोबत गेले. त्यानंतर आरोपी तेव्हापासून बेपत्ता असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत आरोपीचा ठावठिकाण शोधून काढला असता आरोपी आंध्रप्रदेशमध्ये असल्याचे समजले.
72 तासात आरोपी गजाआड - त्यानंतर बदलापूर पोलिसांचे पथक आंधप्रदेशला रवाना झाले. मात्र, पोलीस पथक आंध्रप्रदेशला पोहोचल्यानंतर आरोपी पुन्हा कल्याणच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकही आंध्रप्रदेशमधून तातडीने कल्याणाला रवाना होत आरोपीला कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून 72 तासाच्या आत अटक केली आहे.
हेही वाचा - भिवंडीत लाखोंची फसवणूक करणाऱ्या रिपाई ऐक्यवादीच्या नगरसेवकास अटक