ठाणे - राजस्थानमध्ये राहणाऱ्या एका विवाहित तरुणाने एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या बालपणाचा फायदा घेत, प्रेमाच्या जाळ्यात अडकून अहमदाबादवरून चेन्नई एक्सप्रेसमधून पळून घेऊन जात होता. त्या आरोपीला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी एसी डब्यात सापळा रचून कल्याण रेल्वे स्थानकातून पीडित मुलीसह ताब्यात घेतले आहे. सादिक खान, असे आरोपीचे नाव असून त्याला आज (दि. 18 एप्रिल) दुपारच्या सुमारास पीडित मुलीसह राजस्थान राज्यातील जालोर कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पीडितेला प्रेमाच्या आणा भाका देऊन अडकवले जाळ्यात
आरोपी सादिक व पीडित मुलगी हे दोघेही राजस्थानच्या जलोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आरोपी सादिक हा विवाहित असून तो एका मुलाचा बाप असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने पीडित मुलीच्या बालमनाचा फायदा घेऊन तिला प्रेमाच्या आनाभाका देऊन जाळ्यात अडकवले. त्यांनतर 16 एप्रिल रोजी तिचे अपहरण केले होते. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण केल्याची नोंद केली असता जालोर पोलिसांनी पीडितेचा तपास सुरू केला. मात्र, दुसऱ्या दिवशी आरोपीने पीडितेला अहमदाबादला घेऊन गेला. अहमदाबादच्या एका हॉटेलमध्ये मुक्काम करून त्याच दिवशी अहमदाबादवरून चेन्नई एक्सप्रेसमधून दोघे पुढील प्रवासासाठी निघाले होते.
कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांनी रचला सापळा
कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच तत्काळ पोलीस पथकाने कल्याण रेल्वे स्टेशनवरील चेन्नई एक्स्प्रेस येणाऱ्या फलाटावर सापळा लावला. त्यानंतर काही वेळात कल्याण स्टेशनमध्ये चेन्नई एक्स्प्रेस थांबली असता, फौजदार घास्टे व त्यांच्या पथकाने वातानुकूलित डब्यात शोध घेतला. त्यावेळी आरोपी सादिक खान हा त्या अल्पवयीन मुलीसह बसला होता. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले.
आरोपीसह पीडिता राजस्थान पोलिसांच्या ताब्यात
चौकशीदरम्यान हे दोघे राजस्थानमधून पलायन करून अहमदाबादला गेले होते व तेथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी सांगितले की, हे दोघे अहमदाबादहून चेन्नईला जात होते. माहिती मिळताच आमच्या पथकाने कल्याण स्टेशनवर दोघांना पकडले. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर तातडीने ही माहिती राजस्थान पोलिसांना देण्यात आली. रविवारी राजस्थान पोलीस आल्यानंतर या मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू होते. कायदेशीर प्रक्रियेनंतर जालोर कोतवाली येथील जमादार भगीरथ बिष्णोई यांच्या आज ताब्यात देण्यात आले.
हेही वाचा - अखेर सावद जिल्हा कोविड रुग्णालयास ऑक्सीजन मिळाले; रुग्ण दाखल करण्यास सुरुवात