ठाणे - नवीन कसारा घाटात नाशिकहून मुबंईकडे जाण्यासाठी घाट उतरत असताना कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर घाटातील लतिफवाडीच्या वळणावर उलटून अपघात झाल्याची घटना रविवारी (दि. 29 मे) सकाळच्या सुमारास घडली आहे.
चालक अपघातग्रस्त कंटेनरमध्ये अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सदस्यांना मिळताच महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांसह क्रेन व जेसीबीच्या साहायाने एका तासाच्या प्रयत्नानंतर चालकाला बाहेर काढल्याने बचावला. मात्र, अपघातात चालकाच्या एका पायाला गंभीर दुखापत झाल्याने पाय निकामी झाल्याची माहिती डॉक्टरने दिली आहे. रवींद्र सिंग, असे कंटेनर चालकाचे नाव असून तो गोरखपूर येथील राहणारा आहे. तर क्लीनर अमित कुमार शुक्ला हा किरकोळ जखमी झाला आहे.
आज सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कसारा घाट महामार्गाच्या शेवटच्या वळणावर ( एम एच 04 जे के 0315) कंटेनर अचानक उलटला असून त्यात चालक अडकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस केंद्राचे अधिकारी वालझडे व आपत्ती व्यवस्थापन पथकाचे शाम धुमाळ हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. क्रेन व जेसीबीच्या सहायाने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात ( Igatpuri Rural Hospital ) दाखल केल्याची माहिती शाम धुमाळ यांनी दिली.