ठाणे - सर्वोच्च न्यायालयामध्ये आज (१५ जुलै) मराठा समाजाच्या वैद्यकीय प्रवेश आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होऊ दिला जाणार नाही. मराठा आरक्षणावर कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळू नये यासाठी पूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले.
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने वैद्यकीय प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून अॅड. अभिषेक गुप्ता हे सर्वोच्च न्यायालयात विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ वकील म्हणून काम पाहणार आहेत. ते न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडतील. सुनावणीमध्ये सत्याचा विजय होईल. विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. न्यायालयावर आमचा विश्वास आहे, असेही पाटील म्हणाले.
१ डिसेंबर २०१८ पासून मराठा आरक्षण विधेयक लागू -
राज्यातील मराठा समाज शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण लागू करण्यासाठी विधिमंडळाने विधेयक संमंत केले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. १ डिसेंबर २०१८ पासून राज्यात मराठा आरक्षण विधेयक लागू झालं. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद मराठा आरक्षण विधेयकात केली. यामध्ये ओबीसी समाजाला कोणताही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले.