मुंबई - एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल, असा टोला शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीसह मनसेला लगावला. कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहरमध्ये राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेत मनसेला छुपा पाठिंबा दिला आहे. यावरुन शेलार यांनी राष्ट्रवादीसह मनसेला लक्ष्य केले. ते ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना 1 लाख 67 हजार शेततळी आणि विहिरी दिल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या काळातील आकडेवारी सांगावी असे थेट आवाहनही त्यांनी यावेळी दिले.
मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातही सरकारने खूप कामे केली आहेत. या ठिकाणी अनेक प्रकल्प आणि बेघरांना घरे दिली आहेत. गतिमान वाहतुकीसाठी या सरकारने काम केले आहे. समृद्धी महामार्गाचेही काम चालू आहे. मेट्रो प्रकल्प देखील आपण वेगात आणला. रोजगाराकडे या सरकारने लक्ष दिले आहे.
हेही वाचा - सरकारचा पीएमसीमध्ये थेट हस्तक्षेप नाही - निर्मला सीतारामन
हेही वाचा - पवारांचे नाव येताच ईडीला घाम फुटला- खा. कोल्हे
मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी भाजप सरकारने सर्वांना एकत्र घेतले. शरद पवार यांच्या काळात किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली? असा सवालही यावेळी त्यांनी केला. सहकारी बँकांना त्यांनी पैसे दिले हे आता उच्च न्यायालयानेदेखील स्पष्ट केले आहे. असे वक्तव्य करुन त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले आहे. आरेबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याबाबत मी काही बोलू इच्छित नसल्याचे शेलार म्हणाले. युतीच्या वचनामाप्रमाणे युती सरकार राम मंदिर पूर्ण करेल, असेही ते म्हणाले.