नवी मुंबई - खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मौसम घरती (१८) असे त्याचे नाव आहे. हा धबधबा धोकादायक असल्याचे पोलिसांकडून घोषित करण्यात आले आहे. धबधबा धोकादायक असून, धबधब्यावर कोणीही जाऊ नये, असं परिपत्रक देखील पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पोलिसांकडून काढण्यात आले आहे. मात्र तरी देखील अनेक जण पोलिसांची नजर चुकवून धबधब्यावर जात असतात. मैसम घरती हा तरुण आपल्या मित्रांसोबत पांडवकडा धबधब्यावर गेला होता. याचदरम्यान त्याचा बुडून मृत्यू झाला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई मानखुर्द येथे राहणारा तरुण मौसम घरती (१८) व त्याचे मित्र गौरव लोखंडे, अखीप खान, सुरज यादव, राहील खान हे खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर आले होते. धबधब्यावर जाण्यासाठी पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. मात्र ते पोलिसांची नजर चुकवून मंगळवारी धबधब्यावर पोहोचले. त्याचदरम्यान अचानक पाऊस सुरू झाला. पाण्यात पोहण्यासाठी मौसम घरती याच्यासह त्याच्या मित्रांनी पाण्यात उड्या मारल्या, मात्र अचानक पाणी वाढल्याने ते सर्व पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागले. मात्र त्यातील गौरव व राहील यांना पोहोता येत असल्याने त्यांचे प्राण वाचले, परंतु मौसम घरती याला पोहता येत नसल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्रभर मौसमचा शोध घेतला, अखेर आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मौसम घरती याचा मृतदेह आढळून आला आहे.
पांडवकड्याचा धोकादायक धबधब्यांच्या यादीमध्ये समावेश
खारघरमधील पांडवकडा हा धबधबा धोकादायक असून, आतापर्यंत अनेक जणांचे धबधब्यावरून पडून व बुडून मृत्यू झाले आहेत. त्यामुळे हा धबधबा धोकादायक असल्याचे पोलिसांकडून घोषित करण्यात आले आहे. तसेच या धबधब्यावर जाण्यास देखील मज्जाव करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पांडवकडा धबधबा धोकादायक असून, धबधबा परिसरामध्ये कोणीही जावू नये असे परिपत्रक देखील पोलिसांकडून काढण्यात आले आहे.
हेही वाचा -पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा!!! पुरुषांनी चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा