ठाणे - 'लव्ह प्यार और धोका' या हिंदी चित्रपटासारखी कथा एका ३८ वर्षीय पीडितेच्या जीवनात घडल्याचे समोर आले आहे. ४२ वर्षीय आरोपीची ओळख या पिडीतेशी शादी डॉटकॉमवर झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत तिच्याशी जवळीक साधली. पुढे लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. तसेच, त्याने पीडितेच्या सोन्याच्या दागिनेही पळवले. याप्रकरणी महिलेने डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या व्यक्तीवर गुन्हा नोंद करत, त्याला अटक केली आहे. चंद्रकांत माने (वय ४२, रा. बोरीवली, मुंबई) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
'वारंवार ठेवले शारीरिक संबंध'
पीडित महिला जुनी डोंबिवली पश्चिम भागात राहणारी असून, तिने गेल्या वर्षी विवाहासाठी वर शोधत असताना तिने शादी डॉटकॉमवर माहिती अपलोड केली होती. त्यानंतर (जुलै २०२०) रोजी मुबंईच्या बोरिवली भागात राहणाऱ्या चंद्रकांत माने या व्यक्तीशी ओळख झाली. या ओळखीतून चंद्रकांत रोज या मुलीच्या घरी यायचा जायचा. काही दिवसांनी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यांनतर राहत्या घरात वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला.
'अन्य दोन महिलांचीही फसवणूक'
जुलै (२०२० ते १५ जानेवारी २०२१) या काळात पीडितेच्या घरी येऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असतानाच, त्याने १० तोळे ५ ग्रॅम सोन्याचे दागिने पळवले आहेत. दरम्यान, या व्यक्तीने आणखी दोन महिलांनाही अशाच पद्धतीने लग्नाचे अमिष दाखवून फसवले असल्याचे समोर आले आहे. या माहितीवरून पोलिसांनी चंद्रकांत माने या व्यक्तीला अटक केली असून, अधिक तपास विष्णूनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत.