ठाणे - 12 लाखांच्या लोखंडी सळईचा माल कळंबोली येथील उड्डाणपुलाखाली उभा असलेल्या ट्रेलरसहीत चोरी गेला होता. यातील चोरट्यांना गजाआड करण्यात कळंबोली पोलीस यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी दोन जणांना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहेत. 12 लाखांच्या मालासह ट्रेलर आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे.
हेही वाचा- कोश्यारी पहिलेच नाहीत.. यापूर्वीही राज्यपालांचे अनेक निर्णय ठरले वादग्रस्त
ट्रेलर चालक सोपान बनखडके यांनी 1 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता ट्रेलर कळंबोली फायर ब्रिगेडजवळील उड्डाणपुलाखाली पार्क केला होता. उरणमधील एका गोदामातून तब्बल 12 लाखांच्या लोखंडी सळई या ट्रेलरमधून आणण्यात आली होती. रात्री 2 च्या सुमारास ट्रेलर चालक सोपान बनखडके यांची नजर चुकवून चोरट्यांनी ट्रेलर चोरला. यात 12 लाखांच्या लोखंडी सळई होती. दहा दिवसांच्या आतच कळंबोली पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
अली अन्वर समसाद अहमद शेख (वय २२ रा. मुंबई), मेहमूद अब्दुल हकीम खान (वय ३८) असे आरोपीचे नावे आहेत. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. अली अन्वर शेख व जाबीर यांनी चोरी केलेला माल हा मेहमूद खान याच्या सांगण्यावरुन गोवंडी बैगनवाडी येथे लपवून ठेवला होता. या घटनेतील जाबीर नामक तिसऱ्या आरोपीस अटक करण्यास अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. कळंबोली पोलिसांनी चोरीस गेलेला १२ लाखांचा ३० टन वजनाची लोखंडी सळई व आठ लाखांचा ट्रेलर ताब्यात घेतला आहे.