ठाणे - मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. त्यातच जंगल शेती भागात राहणाऱ्या विषारी, बिन विषारी सापांसह अजगराने भक्ष्य शोधण्यासाठी मानवीवस्तीत आसरा घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच एका घटनेत भिवंडी शहरातील चाविंद्रा गावातील नागरीवस्तीत भलामोठा अजगर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अजगर वस्तीत शिरल्याने गोंधळ
भिवंडीतील चाविंद्रा गावात असलेल्या नागरीवस्तीत मंगळवारी (दि. 21 सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास एका रहिवाशाला भलामोठा अजगर अडगळीत दडून बसल्याचे दिसले. त्याने अजगर आपल्या वस्तीत शिरल्याची माहिती इतर रहिवाशांना दिली. त्यामुळे वस्तीत एकच गोंधळ उडाला होता. दुसरीकडे एका नागरिकाने वस्तीत अजगर शिरल्याची माहिती भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यलयात दिली.
अजगराला जंगलात सोडून जीवदान
घटनेची माहिती मिळताच या अजगराला रेस्क्यू करण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी नितीन चव्हाण, वाहनचालक प्रविण मोरे, फायरमॅन नितीन पष्टे, हरिचंद्र वाघ, अविनाश शिर्के यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर या अजगराला वस्तीतील एका भिंतीच्या अडगळीतील भागातून शिताफीने पकडले. अजगर पकडल्याचे पाहून वस्तीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा अजगर 12 ते 13 किलो वजन असून त्याची लांबी सहा फुट आहे. या अजगराला पडघा परिसरातील डोंगराळ भागातील जंगलात सोडून त्याला जीवदान दिले आहे.
हेही वाचा - केंद्र सरकारच्या श्रमिक योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने ठाण्यात उपक्रम सुरु