ठाणे - काळजाचा ठोका चुकवणारी घटना मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकात घडली. प्लाटफॉर्मवर आपल्या अंध आईसोबत चालत असताना एक चिमुकला अचानक रेल्वे रुळावर पडला. त्याच सुमारास या रुळावरून वेगाने उद्यान एक्सप्रेस येत होती. यावेळी रुळांवर काम करणाऱ्या एका पॉईंटमनने जिवाची बाजी लावत या चिमुकल्याला रुळावरून उचलले व त्यास प्लाटफॉर्मवर ठेवून त्याचा जीव वाचवला. मयूर शेळके असे चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या पॉईंटमनचे नाव आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन
तोल जाऊन तो रेल्वे रुळावर पडला
वांगणी रेल्वे स्थानकातील प्लाटफॉर्मवर एक अंध महिला शनिवारी संध्याकाळच्या सुमारास आपल्या मुलासह चालत होती. याचवेळी, तो मुलगा प्लाटफॉर्मच्या कडेला गेला आणि तोल जाऊन तो रेल्वे रुळावर पडला. दरम्यान मुंबईकडे जाणारी उद्यान एक्स्प्रेस ट्रेन अवघ्या काही सेकंदातच तिथे येणार होती. चिमुकला रेल्वे रुळावर पडल्याचे पॉईंटमन मयूर शेळके यांनी पाहिले. एक्स्प्रेस समोर दिसल्याने क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला प्लॅटफॉर्वर घेतले. अवघ्या काही सेकंदांनी मुलगा आणि पॉईंटमनचेही प्राण वाचले. त्यानंतर एक ते दीड सेकंदांच्या अंतराने याच रुळावरून एक्सप्रेस वेगात पुढे निघून गेली.
आणि जिवाची बाजी लावली
स्वत:चा जीव धोक्यात घालून चिमुकल्याचे प्राण वाचवणाऱ्या शेळके यांनी दोन दिवसांपूर्वी घडलेला संपूर्ण थरार सांगितला. शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उद्यान एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी मी ड्युटीवर होतो. त्यावेळी एक अंध महिला तिच्या मुलाला घेऊन फलाटावरून चालत होती. तिच्या नकळत तो मुलगा फलाटावरून खाली पडला. त्यावेळी समोरून एक्स्प्रेस येत होती. मुलाला वाचवणे गरजेचे आहे, असा निर्धार मी मनाशी केला आणि जिवाची बाजी लावली. त्यानंतर मी लगेचच मुलाच्या दिशेने धावत सुटलो, असा थरार शेळके यांनी सांगितला.
रेल्वेमंत्री पीयूष गोयलनेही केले कौतुक
पॉईंटमन मयूर शेळके यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता वेगवान एक्स्प्रेसच्या दिशेने धाव घेत चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून मयूर शेळके यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. गोयल यांनी मयूला फोन केला. रेल्वे परिवार आपला आभारी आहे, असे यावेळी त्यांनी मयूरला सांगितले.
हेही वाचा - वसई तालुक्यात मोठे कोविड सेंटर उभारावे; अपंग जनशक्तीचे देविदास केंगार यांची मागणी