ठाणे - रिझर्व्ह बँकेत नोकरी लावून देतो आणि म्हाडा गृहसंकुलात स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून गरजूंना लाखोंचा गंडा घालणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ठाणे खंडणीविरोधी पथकाने कल्याणमधील खडकपाडा परिसरात ही कारवाई केली. प्रशांत बडेकर उर्फ अरविंद सोनटक्के, असे त्याचे नाव असून त्याने ९ जणांना जवळपास ८९ लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
प्रशांत बडेकरने मुंबई रिझर्व्ह बँकेत लिपिक पदासाठी नोकरी आणि म्हाडा गृह संकुलात स्वस्त दरात घर मिळवून देतो, असे आमिष दाखवत अनेक गरजू नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले होते. यापूर्वी सातारा, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील 9 जणांकडून त्याने 89 लाख 2 हजार 500 रुपये उकळले. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. या गुन्ह्यांचा समांतर तपास ठाणे खंडणीविरोधी पथक देखील करत होते.
अखेर ठाणे खंडणी विरोधी पथकाला त्याचा सुगावा लागला. तो कल्याण पश्चिम खडकपाडा टावरीपाडा येथे संकेश्वर प्रेसिडन्सी येथे राहत असल्याचे समजले. पथकाने तत्काळ याठिकाणी सापळा रचत प्रशांत बडेकर उर्फ अरविंद सोनटक्के याला प्रेसिडन्सी सोसायटी समोरील रोडवरून ताब्यात घेतले. तो वेगवेगळ्या मासीक पुस्तकातून ग्राहकांचे फोन नंबर प्राप्त करून त्यांना मुंबई शाखेच्या रिझर्व्ह बँकेत लिपिक पदासाठी नोकरी आणि मुंबई येथील म्हाडा गृहसंकुलात स्वस्त दरात घर घेवून देतो, असे आमिष दखवले. त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संबंधित कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दिपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त एन.टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या चमूने केली.