ठाणे - नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून एका तरुणाने तीन जणांवर ब्लेडने वार केले आहेत. ही घटना उल्हासनगरमधील कॅम्प ५ येथील न्यू नेहरुनगर प्रेमनगर टेकडी परिसरात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संतोष चिंचवलीकर (वय १९) हा तरुण बोरकर कुटुंबीयांच्या घरासमोर रविवारी रात्री आला. त्यावेळी बोरकरांचा मुलगा करण (वय १२) हा घरासमोर बसला होता. तेव्हा संतोषने करणकडे १० रुपये मागितले. करणने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघात शाब्दिक चकमक उडाली. त्यावेळी करणची आई आशा या त्याठिकाणी आल्या. संतोषने त्यांच्याकडेही पैसे मागितले. त्यांनीही नकार दिल्यामुळे संतोषला त्यांचा राग आला.
थोड्या वेळाने करण घराच्या बाहेर गेला असता, संतोषने त्याला पकडून धारदार ब्लेडने त्याच्यावर वार केले. मुलाला सोडविण्यासाठी आशा गेल्या असता त्यांच्यावरही वार केले. या दोघांना सोडवायला गेलेले शेजारी बाबूराव मगरे यांच्यावरही संतोषने वार केले. तेव्हा परिसरातील इतर तरुण मदतीला धावून आले. त्यांनी संतोषला ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
या हल्ल्यात तिघांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. परिसरात नशेखोर तरुणांचा वावर वाढला आहे. यांच्यावर पोलिसांनी त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धुम करत आहेत.