ठाणे - मध्य रेल्वेच्या कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या एका रेल्वे वसाहतीमधील साठवून ठेवलेल्या कचऱ्याला भीषण आग लागली. ही आग काल रात्री ११ च्या सुमारास लागली. या घटनेमुळे रेल्वे वसाहतीत राहणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आगीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता.
कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन असल्याने स्थानक लगतच्या परिसरात रेल्वे प्रशासनाच्या वसाहती आहेत. अशीच एक वसाहत कल्याण पश्चिम परिसरातील वालधुनीकडे जाणाऱ्या पुला लगतच असलेल्या रेल्वे हायस्कूल समोर आहे. या वसाहतीच्या पुलालगत भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले होते. याच कचऱ्याच्या ढिगाऱ्याला काल रात्री ११ च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. रेल्वे वसाहतीत आग लागल्याची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थाळावर दाखल झाले व त्यांनी आगीव नियंत्रण मिळवले.
दरम्यान, आगीमुळे कल्याण-मुरबाड आणि कल्याण-उल्हासनगर या दोन्ही मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहतुकीवर काही वेळ परिणाम झाला होता. परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही आग अचानक लागली की लावण्यात आली, याचे कारण अध्याप समजू शकले नाही. या आगीत कुठलीही जीवित अथवा वित्तीयहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मात्र, रेल्वे वसाहतीत कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे वसाहतीमधील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजावर आढळला विषारी घोणस