ठाणे - भिवंडी शहरालगतच्या अंजूरफाटा चरणीपाडा येथील झाडाझुडुपात एक महिन्याचे स्री जातीचे जिवंत अर्भक सापडले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भिवंडी शहरालगतच्या चरणीपाडा येथील रमीबाई जीवा रायात ही आदिवासी महिला सकाळी शांती वेअर हाऊसलगतच्या मोकळ्या जागेत आपल्या बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेली होती. त्यावेळी तेथील झाडाझुडुपात गवतावर एक महिन्याचे स्री जातीचे बाळ रडत असताना बेवारस स्थितीत तिला दिसले. त्यामुळे तिने याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. त्यानंतर याबाबत नारपोली पोलिसांना कळवण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक जी.बी.गणेशकर यांनी पोलीस पथकासह धाव घेऊन बाळाला घेऊन उपचारासाठी प्रथम स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय उपचारानंतर बाळाला पुढील देखभालीसाठी डोंबिवलीच्या जननी आशिष बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा - प्रेयसीचा खून करून कचरा कुंडीत जाळला मृतदेह; प्रियकर गजाआड
या स्त्री नवजात बाळास अज्ञात महिलेने जन्म देऊन अनैतिक संबंधाची लपवणूक करण्यासाठी किंवा तिचा कायमचा त्याग करण्यासाठी तिला टाकून दिल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात पालकांविरोधात भा.दं.वि. कलम ३१७ प्रमाणे नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - घणसोली परिसरात विजेचा धक्का लागून चार मुले जखमी