नवी मुंबई - मित्राच्या पत्नीच्या एकतर्फी प्रेमात पडलेल्या तरुणाने प्रेमात अडसर असणाऱ्या मित्राचाचं खून केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील रबाळे येथे घडली आहे. नवी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला गजाआड केले आहे.
एका ठिकाणी काम करत असता झाली मैत्री:
नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्रानेचं मित्राची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत नागेंद्र पांडे (30) व त्याचा मित्र अर्जुन चौधरी (28) हे एकच ठिकाणी काम करत होते, त्यामुळे त्या दोघात गाढ मैत्री झाली. त्यामुळे त्यांचे एकमेकांसोबत खाणे-पिणे व एकमेकांच्या घरी जाणे होऊ लागले.
मित्राची पत्नी मनात भरली:
मृत नागेंद्र पांडे यांच्या घरी अर्जुन चौधरी हा वारंवार जाऊ लागला. नागेंद्रची पत्नी ही दिसायला सुंदर असल्याने आरोपीच्या मनात भरली व तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. नागेंद्र घरी नसतानाही तो त्यांच्या घरी जाऊ लागला, तसेच त्याच्या पत्नीला प्रेमाची गळ घालू लागला. मात्र आरोपी अर्जून चौधरीला नागेंद्रच्या पत्नीने स्पष्टपणे नकार दिला व तिचे प्रेम फक्त तिच्या नवऱ्यावर असल्याचे आरोपीला सांगितले. पुन्हा असा प्रकार करू नको अशी तंबीही दिली.
मित्राचा काटा काढल्याने त्याची पत्नी आपली होईल या हेतूने केला खून:
आपल्या पत्नीवर अर्जुन चौधरी हा एकतर्फी प्रेम करीत असल्याची माहिती मिळताच रागाच्या भरात नागेंद्र हा अर्जुनला जाब विचारण्यासाठी त्याच्या घणसोली येथील घरी गेला. यावेळी त्यांच्यात वाद झाला. मित्राचा काटा काढला तर त्याची पत्नी आपली होईल या हेतूने अर्जुन चौधरी याने मृत नागेंद्र याच्या डोक्यावर लोखंडी गज आणि चाकूचे घाव घालत खून केला. झाल्या प्रकारानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार झाला.
पती हरविल्याची मृताच्या पत्नीने दिली होती तक्रार:
मृत नागेंद्र घरी न आल्याने त्याची पत्नी सुनंदा पांडे हिने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्या नागेंद्र पांडे याच्या भावाच्या सांगण्यावरून आरोपीच्या घराची तपासणी केली असता त्याच्या घरात नागेंद्रचा मृतदेह सापडला व त्यानुसार पोलिसांनी तपास करीत पश्चिम बंगालचा मूळ रहिवासी असलेल्या अर्जुन चौधरीला इगतपुरी येथून ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. अधिक चौकशीत आरोपींने खुनाची कबुली दिली असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.
हेही वाचा - कोरोनाच्या सावटाखाली टोकियो ऑलिम्पिकला सुरूवात