ठाणे (नवी मुंबई) - तळोजा औद्योगिक वसाहतीत एका केमिकल कंपनीला सकाळी भीषण आग लागली होती. ही आग पसरल्याने या परिसरातील चार कंपनींना आग लागली आहे. ही आग अजूनही नियंत्रणात आली नसून अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सलग चार कंपन्याना लागली आग -
सकाळी तळोजा एमआयडीसी मध्ये 11 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीला आग लागली होती. त्यानंतर ही आग पसरत गेल्याने बाजूला असणाऱ्या प्लॉट क्रमांक 32 मधील गौरी ऍसीड, प्लॉट क्रमांक 33 मधील स्टॅण्ड पॅक प्रा.लि. तसचे प्लॉट क्रमांक 35 मधील शारदा फेब्रिकेशन प्रा.लि. अशा एकूण चार कंपन्यांमध्ये आग लागली. घटनास्थळी 12 अग्निशमन दलाच्या गाड्या व 7 पाण्याचे टँकर पोहोचले असून त्यांचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.
स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण -
केमिकल कंपनीला लागलेली आग शेजारी असलेली कंपनीच्या दिशेने पसरली असून केमिकलचे ड्रम फुटून मोठ्या प्रमाणात स्फोट होत आहेत. या स्फोटाच्या आवाजामुळे तळोजा एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शॉक सर्किटमुळे आग लागली असावी प्राथमिक अंदाज -
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अझीवो क्रिस्ट ऑरगॅनिक प्रा. लिमिटेड या न्यू केमिकल झोन येथील केमिकल कंपनीला आज सकाळी 11 च्या सुमारास भीषण आग लागली होती. शॉक सर्किटमुळे ही लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही जीवितहाणीची अद्याप माहिती समोर आली नसली, तरी अर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
एक महिन्याआधी सुद्धा लागली होती आग -
जवळपास एक महिन्याआधी औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक जे-39 वर असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला आग लागली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या घटनेत एका अग्निशमन दलाच्या कर्मचाराऱ्याचा मृत्यूही झाला होता. तसेच अन्य जखमी जवानांना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.