ठाणे - लोडशेडिंगचा संबंध नसतानाही कल्याणच्या वालधुनी परिसरात दररोज 8 तास वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार महावितरण कंपनीकडून सुरू असल्याचे दिसून येते आहे. दररोजच्या वीज खंडित प्रकरणामुळे वालधुनीतील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे या भागातील रहिवासी कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
कल्याणच्या पूर्व भागातल्या वालधुनीमध्ये गेल्या महिन्याभरापासून दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीज खंडित होत असल्यामुळे या परिसरातील रहिवाशी मेटाकुटीला आले आहेत. महावितरण कार्यालयात तक्रारी करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दिवसभरात 8 तास बत्ती गुल होत असल्यामुळे घरातील अनेक महत्त्वाची कामे रखडत असल्याचा आरोप या भागातील गृहिणी करू लागल्या आहेत. स्वयंपाक, घरकाम, मुलांचे अभ्यास, तसेच त्यांचे शाळेतील प्रोजेक्ट् देखील अपूर्ण राहत आहेत. परिणामी केवळ बत्ती गुलमुळे मुलांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप वालधुनीतील रहिवासी गीता दळवी यांनी या संदर्भात बोलताना केला.
या प्रकरणी अनेक तक्रारी करून देखील महावितरण कंपनीकडून थातूरमातूर उत्तरे देण्यात येतात. मागील महिन्याभरापासून या परिसरातून अनेकांनी वीज पुरवठा नियमित करावा, यासाठी पत्रव्यवहार करून देखील जाणूनबुजून महावितरण अधिकारी तक्रारींकडे कानाडोळा करत आहेत, असा नागरिकांनी केला. तसेच लवकरात-लवकर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त रहिवाशांनी दिला आहे. विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर महावितरणचे अधिकारी माहिती देण्यास तयार नसल्याने वालधुनी भागात 8 तास बत्ती गुल हेण्याचे तांत्रिक कारण कळू शकले नाही.